एक वेदना जी शब्दात मावत नाही…. आणि भावनेतून सर्वांनाच कळत नाही. पण ती प्रत्येक भुकेल्या पोटातून बोलत राहते. हो एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड यांची सामाजिक विषमतेवरील स्वतः जगून केलेली विदारक मांडणी. यातून गरिबीच्या विस्तवावर अफाट चटके बसलेले लेखकाचे मन व आयुष्य दर्शित होते. या संघर्षातून लेखकाने सामाजिक वेदना सांगितली आहे. अर्थात याला व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. गरीबी, उपासमार, अपमान, कष्ट आणि तरीही न तुटणारी जिद्द! आजही आपल्या समाजात कित्येक देवा झिंजाड आहेत जे जिद्दीने परिस्थितीशी लढताना आपण पाहतो. त्यामुळे ही वेदना फक्त लेखकाची नाही तर त्या प्रत्येकाची आहे ज्याचं आयुष्य आज गरजांशी लढत आहे. ही सामाजिक असमानता माणसाकडून बालपण, स्वाभिमान आणि स्वप्न हिरावून घेते. अशावेळी अशा मुलांसाठी अचाट सहनशक्ती व कष्ट हाच आधार राहतो.
या पुस्तकात एक भाकर तीन चुली म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी मुलगा दुसऱ्या ठिकाणी कामाला, मुलगी लग्न होऊन सासरी आणि वृद्ध आई-वडील एकटे घरी. हे चुकीचं नाही तर हा परिस्थितीशी केलेला समझोता आहे. पण तरीही लेखकाला वेदना जाणवते की सोयीसाठी आपण नाती किती सहज बाजूला ठेवतो. व्यवस्थेने आणि परिस्थितीने माणसाला कसं स्वार्थी बनवलं याचा लेखक आरसा दाखवतात. यात भरडली जाते…. भावना…. वृद्ध आई-वडिलांचे एकाकीपण, मुलांचे अपराधी मौन आणि सासरी गेलेल्या मुलीचं हळवं प्रेम…. हीच वेदना आहे.
एकेकाळी घरात एकच चूल होती, जिथे भाकर शिजत नव्हती पण नाती घडत होती. पण आजच्या परिस्थितीनुसार ही घडी विस्कटली असली तरी, मला वाटते भाकर एकच असली तरी वाटून खाता येते, नाती जपता येतात. प्रश्न दारिद्र्याचा नाही तर एकमेकांसाठी उभे राहण्याचा, एकमेकांसाठी थोडं थांबण्याचा, नाती जपण्याचा या निवडी अजून आपल्या हातात आहेत. संवेदनशील मने हा प्रयत्न नक्की करतील या आशेसह थांबते.😊🙏🏻
वर्षा दाभाडे पाटील
Leave a reply to Abhay Sharad Patil Cancel reply