तिने कधी काही मागितले नाही, पण सगळं अर्पण केलं. तो गेला ,पण तिचं मन त्याच्यापासून कधीही दूर गेलं नाही. विरह तिचं दुःख नव्हतं, तर तो तिचा योग होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेम आजही काळ ओलांडून बोलतं की खरं प्रेम मिळवण्यातच नाही तर हरवण्यातही पूर्णत्व असते. हो… राधा नाव घेतलं की आजही मनात शांत वेदना दाटते.
सुजन शील राधेचे वियोगतही मिलन झाले होते.तिने प्रेमात कधीच सुख शोधले नाही तर फक्त आनंदाचा गाभा मिळवण्यात यशस्वी झाली.तिच्या देहाने विरह अनुभवला पण आत्म्याने कृष्णाला मिळवले होते.कृष्णाच्या बासरी वादणात राधा मिसळून जात असे कारण तीच होती त्याच्या सुरांची आत्मा. राधा म्हणजे आराधना….कृष्णाची,राधा म्हणजे समर्पण…..कृष्णाला, राधा म्हणजे प्रेमाचा अनुभव तर कृष्ण त्या प्रेमाचे स्वरूप. कृष्णासारखा तेजस्वी पुरुष कायमस्वरूपी गोकुळात राहणार नाही हे माहीत असूनही मनापासून सर्वस्व समर्पित करणारी ही माधवी कृष्णाच्या अस्तित्वाला आपलंसं करते. अशी ही गोप किशोरी वृषभानू व कीर्तीदेवी या गोप गोपिकांच्या पोटी व्रज भूमी (आजच्या हरियाणा व राजस्थानचा भाग मुख्यत्वे मथुरा आणि वृंदावन) येथे जन्म घेतला. 14 वर्षे राधाकृष्ण एकत्र गोकुळात राहिले त्यातील दहा वर्ष तर बालपणातच गेले. आपल्या आजच्या भाषेत टीन एज मध्ये मात्र दोघेही लवकर आले. म्हणजे कृष्ण नावाचा आनंद तिला तीन ते चार वर्षेच मिळाला आणि तिने तो आयुष्यभर पुरवला.तो आनंद तिला पुरेसा ठरला असो वा नसो पण त्या प्रेमाने तिला आयुष्यभर वाट बघण्याची ताकद आणि प्रेरणा दिली. खरे प्रेम कधीही स्वामित्व शिकवत नाही तर ते समर्पित असते. तिचा जन्म शापित विरह होता. राधा म्हणते प्रेम हे नऊ पाकळ्यांचे सुगंधी फुल आहे संवाद, विश्वास, आदर, आनंद, संयम, तडजोड,विकास,आत्मीयता आणि क्षमा. ती पुढे म्हणते या फुलातील एक जरी पाकळी गळून गेली तरी ते प्रेम प्रेम राहत नाही एकतर स्वामित्व किंवा वासना त्याची जागा घेते.असे हे सुगंधी फुल राधा आणि कृष्णाने जपले होते. म्हणूनच त्यांचे प्रेम ही शोकांतिका न ठरता मनस्वी प्रेम म्हणून इतिहासाने नोंद घेतली. विरह हा तात्पुरता असतो तर वियोग हा कायमचा असतो. राधा अनेक दशके विरहात होती वियोगात नव्हती कारण तिला माहीत होतं की तिला कृष्णाने परत येण्याचे वचन दिलेले आहे आणि केवळ त्या वाचनाच्या विश्वासावर ती त्याच्या येण्याकडे दशकानुदशके डोळे लावून बसली होती.
राधा आजच्या पिढीला शिकवते की मनुष्य जीवन आणि दैवी जीवन यात खूप मोठा फरक आहे. ती सांगते जीवन आणि आनंद मर्यादित आहे म्हणूनच ते स्वतःच महत्व टिकून आहेत.ती नवा दृष्टिकोन देते की ज्याप्रमाणे स्त्रीच्या मनात काय चालले आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे पुरुषांच्या मनाचे आकलन करणे ही अवघड आहे. पुरुषांमध्ये स्वामित्वाची भावना ओतप्रोध भरलेली असते किंबहुना त्याच्याकडे ती सृष्टीनेच दिलेली आहे., कारण कष्टाची कामे आणि कुटुंबाचे पालन पोषण या दोन गोष्टीमुळे सृष्टी पुरुषाला स्वामित्वाची भावना बहाल करते.मात्र त्याचं प्रेम कधीच आत्मकेंद्री नसतं, तर स्त्री केंद्रीय असतं. त्यामुळेच मोठमोठी महाकाव्य महापुरुष निर्माण करू शकले. स्त्री जन्मतःच लक्षवेधी असते तर पुरुष लक्ष देणारा असतो. राधा आजच्या पिढीला हे समजावून सांगते स्त्रीच प्रेम हे पुरुषासाठी आमंत्रण असते आणि पुरुषाचं प्रेम हे एक अविरत प्रयत्न असतो. अशाच प्रकारे अनादी काळापासून ते आज पर्यंत सृष्टीने स्त्री पुरुषांना घडविले आहे. पण आपण आजच्या काळात बघतो पुरुषाच्या प्रयत्नात किंवा स्त्रीच्या आमंत्रणात कमी पडली की लगेच ब्रेकप किंवा डिव्होर्स असे गोंडस प्रकार वापरण्याची सर्रास पद्धत रूढ झालेली आहे. आज प्रेमापेक्षा व्यवहाराच जास्त बघितला जातो तुझ पॅकेज किती? माझं पॅकेज किती?या गोष्टींमध्येच आयुष्याचा पाया उभारला जात आहे. त्यामुळे समाजाची जी बांधणी आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राधेच नऊ पाकळ्याच सुगंधी फुल आजच्या काळात प्लास्टिक किंवा हायब्रीड फुल म्हणायला हरकत नाही कारण त्याला सुगंधही नाही आणि आयुष्यही. ज्याला भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांची कल्पना नाही आणि त्या समस्या सोडवण्याची हिंमत नाही त्यांनी प्रेमात पडण्याचा धाडसी निर्णय घेऊ नये.असो.
एक स्त्री ज्या भावना अनुभवते त्या सर्व भावना राधाने अनुभवल्या का? तर नाही. कृष्ण वृंदावनात सोडून गेल्यानंतर ती एकटीच वृंदावनात राहिली तिच्या मैत्रिणींची लग्न झाली. त्यांनी संसार सुख, संतती सुख, नातवंडांची सुख भोगली तिने बघितले. तिलाही कुठेतरी याची जाणीव झाली असेल… किंवा याची कमी जाणवली असेल…तिकडे कृष्णाची अनेक लग्न झाली, पुत्रप्राप्ती झाली, द्वारकाधीश झाला पण इकडे राधा एकटीच होती….आजन्म. बिकट परिस्थितीत सुख त्यागून आणि मनावर दगड ठेवून योग्य निर्णय होईपर्यंत स्वतःला समजावत जगणे म्हणजे संयम हे राधाला जन्मजात मिळालेले वरदान होते. ती केवळ प्रेमिका नव्हती तर ती योगिनी होती तिला शरीराचे नव्हे तर आत्म्याचे मिलन हवे होते. तिचा विरह हा वियोग नव्हता तर तो तिचा एकत्वाचा मार्ग होता. तो विरह तिच्या जगण्याचे साधन बनला होता. कृष्णा वरच तिचं प्रेम इतका शुद्ध होतं की त्यात अपेक्षेला जागा नव्हती. पण एका स्त्रीवादी दृष्टिकोनातून हा विरह पाहिला तर तो असा दिसतो की कृष्णाने तिला परत येण्याचे तर वचन दिल पण सोडून गेला. ती एकटी राहिली..तारुण्यात तिने एकांतवास भोगला दशकाणूदशके. तिला साथ दिली नाही…हा अन्याय नाही का?
आजच्या काळात राधेचं प्रेम आपल्याला शिकवतं प्रेम म्हणजे मिळवणे नव्हे तर आत्म अर्पण करणे होय. ती शिकवते खरी नाती जपली जातात ती श्रद्धा, संयम आणि सत्याने. राधा केवळ व्यक्ती नसून ती एक भावना आहे… प्रेमाची भावना जी आजच्या पिढीला देखील प्रेरक आहे. आयुष्याच्या उत्तर काळा त कृष्णाने दिलेल्या वचनाप्रमाणे कृष्ण परत तिच्याकडे आला पण तोपर्यंत ते दोघेही वृद्धापकाळकडे झुकलेले होते. अशावेळी राधा मनुष्य जन्मात होती तिची स्वप्न सगळी धुळीस मिळालेली होती. पण तिने तिच्या स्वप्नांचा बाजार मांडला नाही की दुःखाचं विवरण केलं नाही. ना कृष्णाजवळ तिने कोणती तक्रार केली कारण तिचा एकांतवास तिचा निर्णय होता.जगाने कृष्णाचे प्रेम एक इतिहास बनवला पण राधेचे प्रेम हे अमरत्वाचाच भाग बनले.
लेखक समर लिखित राधा पुस्तकाच्या वाचनाने थोडेसे मतप्रदर्शन.😊🙏🏻
वर्षा दाभाडे पाटील
Leave a reply to Varsha Patil Cancel reply