Book Whisper

@Weekend वाchan

I’m Varsha Patil, an avid reader and Assistant Police Sub-Inspector with the Maharashtra Police Department. I love sharing book reviews that capture the author’s intent and offer my honest opinions helping readers find meaning in stories amidst the chaos of everyday life.

प्रेम हे आचरणासाठी खूप सोपे असते पण ते समजून घेण्यासाठी गूढ, निर्गुण आणि अदृश्य असते. या प्रेमाच्या बाबतीत इतिहासाने राधा- कृष्णाचे प्रेम नल-दमयंतीचे प्रेम आणि राम व सीतेच्या प्रेमाची नोंद घेतली. पण एक हुंदका मात्र बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिला…. हो मी त्या मौन साधिकेबद्दल बोलतेय…… उर्मिला बद्दल. हो हो रामायणातील लक्ष्मणाची उर्मिला, जनक राजाची कन्या उर्मिला, सीतेची प्राणप्रिय बहीण उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्तीची चुलत बहीण उर्मिला.

उर्मिलेची मौनातील महानता खूप मोठी आहे. नवऱ्याने वनवास भोगला पण तिने चार भिंतींमध्ये मनाचा एकांत वास भोगला. रामायणात तिच्या एकांत वासाची दखल घेतली गेली एक-दोन प्रकरणात पण तिचा एकांत वास एक दोन पानात बसणारा होता का? तर नाही तिच्या मनाच्या आयामंचा, द्वंद्वांचा विचार केला गेला का? तर नाही रामायणा नुसार लक्ष्मणाचा जन्म जरी राक्षसांना ठार मारण्यासाठी झाला असेल म्हणजेच( नियती नियोजित )तरी उर्मिला मानव जातीत मोडते कारण तिला भावभावना आहेत, तिला स्वप्न आहेत, तिला शारीरिक भूक आहे, पतीसोबत राहण्याची, जगण्याची मानसिक भूक आहे. या सगळ्या भावनिक हंबरड्याला इतिहासाने ,अगदी लक्ष्मणाने सुद्धा दुर्लक्षित केले. आज आपल्याला सीतेचा वनवासातील त्याग सांगितला जातो पण राजवैभवाचा त्याग करून ती वनवासात गेली तरी तिचा पती तिच्यासोबत होता. तिने सहजीवनाचा आस्वाद घेतला पण… उर्मिलेच्या पदरी काय? याचा अर्थ सीतेचा त्याग कमी होतो असे नाही किंबहुना उर्मिलेचा एकांत वास सरस वाटतो. ती सुद्धा लक्ष्मणाबरोबर 14 वर्षे वनवासात राहण्यास तयार होती पण लक्ष्मणाने भावाचे रक्षणाचे कर्तव्य पुढे करून तिला सोबत घेणे नाकारले. काय दोष होता उर्मिलेचा? तिच्या बहिणीच्या प्रारब्धाशी तिची गाठ मारली होती का? का मारून घेतली होती? तिच्या मनाने कधी विद्रोह करण्याचा विचार केला नसेल का? केला असेल पण तिचे संस्कार आणि चार पुरुषार्थानी(काम,अर्थ, मोक्ष आणि धर्म) तिला बांधून ठेवले होते. तिलाही वाटले असेल हे सगळं सहज झुगारून वनात स्वतंत्र राहू पण कर्तव्य मर्यादा त्याग आणि धर्मपालन( धर्म म्हणजे पुत्री धर्म, पत्नी धर्म, स्नुष धर्म आणि कुल धर्म) हे संस्कार तिच्यावर पण झाले होते. संस्कार हे इतके भक्कम असतात की एकदा रुजल्यानंतर त्यांना नष्ट करणे किंवा बदलवणे शक्य नसते. तसेच उर्मिलाच्या बाबतीत घडले. तिला स्वतःला व्यक्त करावे अशी तिची प्राणप्रिय बहीण (सीता) ही सुद्धा नसल्याने सर्व बाजूंनी उर्मिला एकटी पडली होती. डिप्रेशनचा तिने सुद्धा अनुभव घेतला असेल कधी चार भिंतीशी बोलून, कधी बागेतील फुलांशी बोलून, तर कधी एकटीच अश्रू न ढळता एकांतात रडून. पतीच्या उदात्त कार्यासाठी 14 वर्षांचा एकांत वास मृत्यूपेक्षाही भयंकर होता. तिने तो सकारात्मक विचारांनी 14 वर्षे लवकर संपतील असे बोलून लीलया पेलला होता. पण तिच्या मनाची पडझड झाली ती न भरून निघणारी होती. मनाचे आणि शरीराचे जाम बॉण्डिंग असते. त्यामुळे ती अशक्त झाली असेल, तिलाही स्ट्रेसमुळे स्त्री सुलभ आजारांचा सामना करावा लागला असेल, दुःखाच्या धक्क्यामुळे बेशुद्ध पडली असेल, हातापायांना थरथरी आली असेल.(सीमेवर गेलेल्या जवानाच्या आईला व पत्नीला अशाच भावना होत असतील ना?) आयुष्यशी नेहमी तडजोड करणाऱ्या उर्मिलेला स्वप्नांचा हट्ट करण्याची नियतीने परवानगी च दिली नव्हती. इतिहास सुद्धा मनाच्या द्वंद्वाची दखल कुठे घेतो? नाहीतर उर्मिला बे दखल झाली नसती. लादलेला एकांत वास, लादलेले वंध्यत्व आणि लादलेल्या मानसिक व शारीरिक यातना ह्या कमी होत्या म्हणून की काय काळाने प्राणप्रिय बहीणही (सीता) दूर नेली. एकेक क्षण वर्षाचा झाला असेल तिला. सीतेप्रमाणेच लाडाकोडात वाढलेली राजकन्याच होती ती सुद्धा. मोठ्या लोकांची दुःख सुद्धा मोठी असतात त्यांना मर्यादांच्या आणि कर्तव्याच्या उंबरठ्याने थोपवलेले असते. तिने तिचा विरह मर्यादा, संयम,त्याग आणि कर्तव्याच्या चौकटीत राहून अबोलपणे स्वीकारला आणि काळाने सीतेला गौरवान्वित केले.

14 वर्षांच्या विरहा नंतर उर्मिलेला जगातील सर्व स्त्रियांच्या आनंदाचा परमोच्य क्षण असलेल्या मातृत्वाचा लाभ झाला. आता दुःखाचे वारे संपले असे वाटले…. पण काळाचा महिमा अगाध आहे. काळ हा अनेक जखमा भरून काढतो. तो स्थिती व निर्मितीचा अधिपतीच असतो. वनवासानंतर उर्मिला लक्ष्मणाचे सहजीवन सुखात चालले होते. दोन्ही पुत्र अंगद आणि चंद्र केतू यांचा सम्राट म्हणून वेगवेगळ्या राज्यांच्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला होता. सुखाचे वारे वाहत असताना भगवान श्रीराम यांनी आपला कार्यकाळ संपला असल्यामुळे जलसमाधी घेण्याचा निर्णय लक्ष्मणाला बोलून दाखवला. लक्ष्मणाने बंधू कर्तव्य म्हणून मोठ्या बंधू च्या अगोदर कोणताही विचार न करता प्राणत्याग करण्याची प्रतिज्ञा करून शरयू नदीमध्ये आत्मसमर्पण केले…….

संयम,निशब्द त्याग व प्रेमाचे प्रतीक असलेली उर्मिला कोलमडली…. एका शोकांतिकेचा शेवट झाला. तिचा अंत कसा झाला याची सुद्धा इतिहासाने दखल घेतली नाही. काही ठिकाणी तिने लक्ष्मणाबरोबर शरयू नदीमध्ये उडी घेतली तर काही लोककथांमध्ये ती समाधीस्थ झाल्याचा उल्लेख आढळतो. उर्मिला रणांगणावरची विरांगणा नव्हती तर मौनातील विरांगणा होती. मानव सुलभ भावनांचे विरहगीत तिने गायले होते.प्रत्येक युगात प्रत्येक उर्मिलेच्या गाठी हेच आहे का?

लेखक समर लिखित उर्मिला एका वेगळ्या अंगानी विचार करण्यास भाग पाडते व विद्रोही बनवते.

Posted in

One response to “दुर्लक्षित हुंदका”

  1. Adv. Abhay Sharad Patil Avatar
    Adv. Abhay Sharad Patil

    खूप छान लिहिलं आहे असंच लिहित रहा हळूहळू शब्दांना आणि लेखनाला एक लय मिळते ती अशीच वाढत जाईल. अभिनंदन आणि शुभेच्छा.

    Like

Leave a reply to Adv. Abhay Sharad Patil Cancel reply