एक अगाध अर्थपूर्ण आणि स्वतःच्याच प्रेमात पडणारा शब्द प्रेम. जो जे वांचील तो ते लाहो म्हणजे जो इच्छा व्यक्त करेल ते त्याला मिळो… 16 व्या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना समजलेले निसर्गाचे गुपित. म्हणजे प्रेम हे सेंद्रिय असतं ते कृत्रिम नसतं. प्रेम हे स्थिर असत. त्याला स्वीकारणारे आपण सर्व सजीव मानव प्राणी अस्थिर असतो. प्रेम तर कुबजेच्या कुबडावर पण करायला सांगितले., कारण सुंदरता म्हणजे रंग, वेशभूषा, देखणेपणा हे नव्हे तर जे शरीर व मनाने स्वच्छ आहे, निरोगी आहे ते सगळं सुंदर. किती साधी आणि सोपी सुंदरतेची व्याख्या. जेवढा कोहली सुंदर तेवढाच गेल पण सुंदर, जेवढे महात्मा बापू सुंदर तेवढेच नेल्सन मंडेला पण सुंदर. प्रेम हे जीवनाचा शाश्वत मूल्य आहे. अगदी पुराण काळापासून हे व्यक्त झालेले आहे कधी काव्यात (गीत गोविंद) तर कधी लेखात. सेंद्रिय प्रेमाची देणगी निसर्गाने मुक्त हस्ताने आई नावाच्या स्त्रीला बहाल केली आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या कोणताही पुरुष प्रथम प्रेमात पडतो तो आईच्याच आणि तो आजजन्म या प्रेमात थकत नाही की धुडकावून देत नाही कारण एकच नाळ ही जीवशास्त्रीय संकल्पना त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बांधून ठेवते. तुम्ही कधी लिटमस टेस्ट करून बघा जेव्हा तणावात असाल तेव्हा आईशी बोलणे झाले की न्यूरो सायन्स नुसार ऑक्सीटोसीन( प्रेम हार्मोन )नावाचे द्रव स्त्रवते आणि आपण निवांत होतो. याला बॉण्डिंग हार्मोन सुद्धा म्हणतात. म्हणजेच आपल्याला सुरक्षित वाटते व जिव्हाळा मिळतो. आईशी बोलणे म्हणजे मेंदूला तू सुरक्षित आहे हा संदेश देणे.
स्त्री-पुरुषांच्या प्रेमातील ठळक बाब म्हणजे प्रेमानंतरच आसक्ती निर्माण होते अगोदर आसक्ती असेल तर ते प्रेम वासनेत मोडते. प्रेमानंतरची आसक्ती हा प्रेमाचा अविभाज्य भागच मानायला हरकत नाही. माणूस जेव्हा प्रेमात पडतो त्यावेळी काही काळासाठी त्याच्यातील नकारात्मकता संपून जाते म्हणजेच स्वतःच्या मर्यादा देखील पार करण्याची तयारी असते (प्रेमात पडणे म्हणजे फक्त व्यक्तीच्याच नव्हे काहीजण ध्येयाच्या प्रेमात देखील हीच वर्तणूक करतात).
ज्या बालकांना लहानपणी प्रेमाला पारखे व्हावे लागते किंवा ज्याचे आई-वडील हिंसक असतात अशी बालके स्वतःला सुरक्षित समजून मोठेपणी समाजात असुरक्षितता निर्माण करू शकतात. त्यांच्या मेंदूत डोपा माईन (हॅपी हार्मोन )स्त्रवणे थांबते त्यामुळे प्रेम हे जैविक /सेंद्रिय प्रक्रिया आहे. तुम्ही जेवढे द्याल तेवढे ते अधिक स्त्रवते.
दुसऱ्यावर प्रेम करणे अगोदर स्वतःवर करावे म्हणजे स्वतःचे आरोग्य, करियर, नीटनेटकेपणा यावर लक्ष द्यावेच त्याशिवाय तुमच्यावर समोरचा प्रेम करणारच नाही. आजच्या काळात तर विशेषता मुलांनी आपल्या बँक बॅलन्स वरही लक्ष ठेवावे अन्यथा पोरगी मिळणे अवघड! (काळाची गरज म्हणून )सगळेच प्रश्न तत्त्वज्ञानाने सुटत नाहीत वास्तव परिस्थिती स्वीकारणे सुद्धा आजच्या काळात अनिवार्य आहे. कालच व्हॅलेंटाईन डे झाला. अनेकांची अनेक मतमतांतरे गिफ्ट देणे, फुले देणे म्हणजे भंपक आहे, मार्केटिंग आहे, असले प्रेम टिकणार का ?वगैरे वगैरे अनेक गोष्टी. सोप्या भाषेत सांगते निसर्गानेच नराला प्रदर्शन करायला शिकवले आणि त्याच निसर्गाने त्याच प्रदर्शनावर भुलायला नारीला शिकवले आहे. शेवटी मोर लांडोरी साठी पिसारा फुलून नाचतोच ना😊 आणि लांडोरी पण पिसाऱ्यावर भुलतेच की😊.
प्रेम निरामय असावं. प्रेम स्वातंत्र्य बहाल करते. पण तिथं मालकी हक्काने प्रवेश केला की प्रेम लयाला जाण्यास सुरुवात होते. प्रेमात एकमेकांचा आदर हे प्रेमाचे ब्रीद असाव. विश्वास, समर्पण आणि स्वातंत्र्य ही त्रिसूत्री असली की प्रेम रंगीत होते. शेवटी तेच घोषवाक्य I Love You….. पण I Love You Too हे मात्र प्रत्येक मानवी आयुष्यात संजीवनी ठरावी 😊. प्रेम दिनाच्या सर्वांना उशिरा का होईना शुभेच्छा.
वर्षा दाभाडे पाटील
Leave a comment