बाराव्या तेराव्या शतकातील गोष्ट जातीव्यवस्था अतिशय बळकट होती. तिच्याविरुद्ध उच्च वर्णीय अथवा नीचने विद्रोह करणे म्हणजे कपाळ मोक्ष करून घेणेच होते.तरी धाडस करणारा आपली ओळख ठेवून गेलाच. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने अजरामर झालेला अभंग… हरिभजनाविण काळ घालवू नको रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे अनेक अभंग रचून विद्रोही समतेचा तत्वज्ञ संत चोखामेळा. सामाजिक विषमते विरुद्ध अभंगातून चळवळ उभी करणारा संत चोखामेळा आजच्या आंबेडकर – शाहू चळवळीचा वैचारिक पायाच मानावा लागेल. बघा काळ कसा होता – जोहार मायबाप जोहार बहु भूकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो… यातून आपल्या लक्षात येते समाजाने बहिष्कृत केलेला समाज कसा जगत असेल ! चोखा म्हणतात सर्व माणसे देवाची मग त्यांच्यात भेदाभेद का? आज तरी हे उत्तर मिळाले का?
एवढेच नव्हे किशोरी अमोनकरांनी अजरामर केलेले भक्ती गीत – अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग तसेच जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे ही भक्ती गीत कोणी लिहिली ….संत सोयराबाई… जी स्वतःला चोक्याची महारीण म्हणून अभिमानाने मिरवायची. संत चोखोबांची अर्धांगिनी. समाजातील कष्टाची कामे करून हे दोघे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत. पंढरीचा विठू त्यांचा सखा होता, त्याने कोणाला कधी नाकारले नव्हते.पण कर्मठ समाजाने त्या काळात पंढरपूर मंदिर प्रवेश दोघांना नाकारला. तरी त्यांनी त्यांच्या भक्ती सोडली नाही. जिथे ज्ञानी माणसांची पावले पडतात तिथे ज्ञानाची पंढरी साकारते. त्या काळात समाजाने त्यांना नाकारले तरी आज भजन म्हटले की चोकोबा व सोयराबाई अग्रस्थानी आहेत.अवघा रंग आता एक झालेला आहे. पण दोघांनी सोसलेल्या यातना व मानसिक गुलामी यांची आज कल्पना न केलेलीच बरी. त्यांचे समकालीन संत संत शिरोमणी नामदेव यांनी चोखोबांना साथ दिली. पण ते समाज व्यवस्था बदलवू शकले नाहीत. कठोर समाज रचना मोडण्याची ताकद तेव्हा कोणातच नव्हती. संत नामदेवांनी अन्यायाचे समर्थन कधीच केले नाही पण ते अन्याय थांबू शकले नाहीत ही त्या काळाची मर्यादा होती. नामदेवांचा मार्ग भक्तीचा चोखोबांचा मार्ग भक्ती बरोबर सामाजिक प्रश्न विचारण्याच्या होता. आज संत नामदेवांची पायरी पंढरीच्या विठोबाच्या मंदिरात आहे तर चोखोबांची समाधी विठ्ठल मंदिराच्या परिसरात आहे हेही थोडके नसे. आज दलित साहित्य चळवळीच्या मंचावर चोकोबा उभयतांचा संदर्भ दिला जातो हा त्यांच्या वैचारिक विचारांचा विजय म्हणावा लागेल. पण आज शोकांतिका अशी आहे की किती लोक यांना ओळखतात? चोखोबांच्या अभंगात भक्ती आहे पण अंधश्रद्धा नाही. देवावर श्रद्धा आहे पण अन्यायला सहमती नाही. आजचा वारकरी संप्रदाय हाच विचार पुढे घेऊन जात आहे. हीच त्यांची वैचारिक क्रांती आहे. देवा पेक्षा ही माणसाला महत्त्व देणारा मानवतावादी संत. त्यांचा विद्रोह हिंसक नव्हता तो विचारांचा, शब्दांचा आणि करुनेचा होता. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात असलेली त्यांची समाधी आणि संत म्हणून मिळालेला मान सन्मान हा चोकोबांच्या व सोयराबाई यांच्या विचारांचा विजय आहे.😊🙏🏻
वर्षा दाभाडे पाटील.
Leave a comment