Book Whisper

@Weekend वाchan

I’m Varsha Patil, an avid reader and Assistant Police Sub-Inspector with the Maharashtra Police Department. I love sharing book reviews that capture the author’s intent and offer my honest opinions helping readers find meaning in stories amidst the chaos of everyday life.

कधीकधी आपल्याला वाटते आपल्याला कोणीतरी जखडून ठेवले, बांधून ठेवले, प्रचंड अस्वस्थता जाणवते, मन सैरभैर असते या अवस्थेवर औषध काळ असतो आणि थोड्या कालावधीनंतर जाणीव होते आपल्या आत असलेला विचार, आपले स्वप्न, आपला आनंद दुःख यांची दही मिसळ होऊन पंचामृत झाले आहे. मग मन शांत झाले की जाणवते या भावनांमधले प्रभावी कोण तर स्वप्न आणि त्यांचा दबाव हेच असते.
अशीच अवस्था जगत्जेत्या आंद्रे आगाशीची होती. ती काही काळापूर्ती नव्हती तर ती स्वप्ने आणि तो दबाव आयुष्यभर टोचणाऱ्या पराणी सारखा त्याचा पाठलाग करत राहिली. शिक्षणाला रामराम ठोकून वयाच्या आठव्या वर्षी व्यावसायिक टेनिस खेळायला लावणारे आंद्रे आगाशीचे वडील माईक आगाशी हे आंद्रे च्या दृष्टीने खडूस आणि वेदनादायी बाप होता. घराच्या मागील बाजूस 78 फुटाचे टेनिस कोर्ट बनवून सात वर्षाच्या मुलाकडून माईकने दिवसाला 2500 चेंडू फेकेल अशी मशीन बसवून घेतली होती. माईकचे गणित होते दिवसाला 2500, आठवड्याला सतरा हजार पाचशे आणि वर्षाला दहा लाख चेंडू मारले की जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू होशील. अशा एककली बापाला पोराचे मत विचारात घेण्याची घेण्याची गरज वाटली नाही. पर्यायाने आय हेट टेनिस असेच आंद्रे बोलतो… अगदी शेवटच्या स्पर्धेपर्यंत. त्याला टेनिस मध्ये ढकलून त्याच्या बापाने त्याचे स्वातंत्र्य, त्याचे बालपण, महाविद्यालयाचे सोनेरी दिवस खड्ड्यात पुरून टाकले. अंद्रेला सॉकर प्लेयर बनायचे होते. हा खेळ तो चोरून खेळत असे. घरामागील कोर्टावरील बॉल फेकणारी मशीन त्याला आग ओकणारा ड्रॅगन सारखी भासते. जे त्याला करायचे होते ते न करता जे मुळीच करायची नव्हते ते त्याला करावी लागत होते आणि तेच त्याच्या जीवनाचा स्थायीभाव झाले होते. अशी अनेक दशके तो खेळत राहिला. मनात नकारात्मकता आणि शरीर ढकलणे एवढेच त्याचे काम उरले होते. दरम्यान स्टेफी ग्राफ शी विवाह झाल्यानंतर आंद्रे स्थिर होतो. आयुष्याचा जोडीदार जर प्रेरक असेल तर ती व्यक्ती जग सुद्धा पादाक्रांत करू शकते याला आंद्रे आणि स्टेफी यासारखे मूर्तीमत्त उदाहरण नसावे. भयानकरीत्या तिने त्याच्यात सकारात्मकता भरून त्याची घोडदौड सुरू केली की आंद्रेने परत मागे वळून बघितलेच नाही. अन्यथा 2006 च्या यूएस ओपन मध्ये 36 वर्षाचा आंद्रे 21 वर्षाच्या मारकोस बगदातीस ला हरवू शकला नसता.
आंद्रेने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या पण त्याने टेनिस वर कधीच प्रेम केले नाही….. मग तो जिंकला कसा? हा प्रश्न उरतोच. मला वाटतं तो टेनिस वर प्रेम करत असावा पण त्याची पायाभरणी करणारा, त्याला वेदना देणारा, त्याचे बालपण हिरावून घेणारा, सक्ती करणारा, घरापासून तोडणाऱ्या बापाचा तो तिरस्कार करत असावा. मात्र अंद्रेला हे व्यक्त करता येत नव्हते. वडिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तो कठोर, संतापी बाप असला तरी कामाप्रती 100% समर्पित होता. त्याने आपल्या मुलातील क्षमता जाणली होती. सातत्य आणि प्रयत्न यांची व सरावाची परिसीमा त्याच्या मुलाला जगत्जेता बनवणार होती. फाटक्या संसारात दिवस रात्र कष्ट करून त्याला सुविधा पुरवण्यात त्याचा बाप कमी पडला नव्हता. त्याच्यात स्पर्धात्मक वृत्ती आणि जिद्द होती आणि हाच संस्कार माइक ने आंद्रेमध्ये आटोकाट रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. आंद्रेला हे सर्व शेवटची स्पर्धा जिंकल्यानंतर समजले की आपल्या बापाच्या अचाट प्रयोगांमुळे 869 सामने व 22 ग्रँड स्लॅम काही विजयांसह खेळून आपण जगज्जेता बनलो आणि त्याने हे जाहीररीत्या मान्य केले.आंद्रे म्हणतो मैदान म्हणजे माझ्या आयुष्याचं सर्वसाधारण स्थान असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
असो आंद्रे च्या फरफटीकडे बघून नक्कीच सहानुभूती वाटते. आपली मुले आपली मालमत्ता नसतात. त्यांनाही विचार, मन असते. आंद्रेने जग जिंकले पण आनंद अगदी शेवटी मिळवला. आनंदी मुल यशस्वी होतात पण यशाची मुले आनंदी असतीलच असे नाही. त्यांना समजावलं पाहिजे आपण मी तुझ्यासोबत आहे…. तुला बदलण्यासाठी नाही… तर तुझे सत्व समजून देण्यासाठी. शिस्त आयुष्य घडवते पण निवड निखळ आनंद देते. पालकांनी मुलांना स्वप्न जरूर द्यावीत पण ती स्वप्न जगायची की नाही याचा स्वातंत्र्य ही द्याव. मग वेदनाविरहित स्वप्न कशी झटपट साकार होतात बघा. मुलांचे पाय दणकट करा…. पण दिशा त्यांना ठरवू द्या. या गोड शेवटाने थांबते.🙏🏻😊

ओपन या आंद्रे आगासी यांच्या आत्मकथेतून…!

वर्षा दाभाडे पाटील.

Posted in

Leave a comment